Saturday, 12 April 2014

चामुंडा अपभ्रंशे "चावंड" अर्थात किल्ले प्रसन्नगड

चामुंडा अपभ्रंशे चावंड। जयावरी सप्तकुंड॥
गिरी ते खोदूनी अश्मखंड। प्रसन्नगडा मार्ग निर्मिला॥डिसेंबर महिन्यात नाणेघाटात जाताना चावंड किल्याचे दर्शन झाले होते. १८ जाने. ला एक दिवसाची चावंड किल्याची भटकंती निश्चित झाली. ऑफिसमध्ये विचारले असता अजुन तीन मित्र तयार झाले. सकाळी ६:३० ची कल्याण-जुन्नर एसटीने जुन्नर आणि तेथुन १०वाजताच्या जुन्नर-घाटघर गाडीने चावंड फाटा असा बेत ठरला. सकाळी इतर तिघांना पाच मिनिटे उशीर झाला आणि आमच्या समोरून ६:३०ची जुन्नर गाडी निघुन गेली (त्या दिवशी गाडी अगदी वेळेवर सुटली ). चौकशी केली असता दुसरी गाडी पावणे आठला आहे असे समजल. तितक्यात ठाणे डेपोतुन आलेली "ठाणे-अहमदनगर" गाडी आली आणि त्यातुन "बनकर फाटा" आणि पुढे जुन्नर असे जायचे ठरले. ६:४०च्या दरम्यान गाडी निघाली. मुरबाडच्या १०-११ किमी आधी एके ठिकाणी गाडी थांबली पुढे पाहिले असता अजुन ५-६ गाड्या रांगेत उभ्या होत्या (त्यात कल्याण जुन्नर गाडीही होती ), आत्तापर्यंत एव्हढ्या वेळेस या रस्त्याने गेलो पण कधीच ट्राफिक लागलेल नव्हतं. खाली उतरून गेल्यावर समजलं कि नुकतंच तेथे बाईक आणि ट्रक यांचा अपघात झाला होता.

साधारण पाऊण तासात रस्ता मोकळा केला. या सर्व प्रकारात १०ची जुन्नर-घाटघर गाडी चुकणार यांचा अंदाज आला, पण नाईलाज होता. या अपघातानंतर गाडीत, नववर्षाच्या सुरूवातीला "ठाणे-नगर" या एसटीला झालेल्या अपघाताची चर्चा सुरू झाली आणि योगायोग असा होता कि आम्ही ज्या गाडीत होतो ती तीच ठाणे डेपोतील, त्याच वेळेस जाणारी दुसरी गाडी होती. माळशेज घाटातुन जुन्नरकडे जाताना ३७ जणांचे बळी घेणार्या त्या एसटीचे अवशेष दिसत होते.

साधारण १०:३० च्या दरम्यान आम्ही जुन्नरला पोहचलो. चौकशी केली असता चावंड मार्गे जाणारी "जुन्नर-कुकडेश्वर" एसटी साडेअकराला होती. एका तासाने गाडी आली आणि आम्ही १२-१२:१५च्या दरम्यान चावंड फाट्यावर उतरलो. जुन्नरहुन चावंडला जाताना आणि परत येताना तीच गाडी होते. (रस्त्याची स्थिती आणि गाडीची अवस्था यामुळे अगदी शेजारी बसलेल्या मित्रांसोबत बोलण्याचे सारे प्रयत्न निष्फळ होत होते. फक्त आणि फक्त खडखडाट ) किल्याकडे जाणारी वाट विचारून घेतली. पुढे गेल्यावर हापश्याच्या इथे एक वाट चावंड गावात जाते आणि दुसरी वाट किल्यावर जाणार्या पायर्यांकडे जाते. तेथेच एका आंब्याच्या झाडाखाली बसलो सोबत आणलेला खाऊ खाल्ला आणि हापश्यातलं गार पाणी पिऊन साधारण १२:४५ ला भर उन्हात चावंड किल्ला चढायला सुरूवात केली.

नुकत्याच्य बांधकाम केलेल्य पायर्‍यांपासुन गडावर जाणारी वाट सुरू होते. या पायर्‍या संपल्यावर सोप्पासा रॉकपॅच पार केल्यावर रेलिंगची वाट सुरू होते. जुन्या रेलिंग काढून येथे नवीन रेलिंग लावलेल्या आहेत त्यामुळे त्यातील थ्रील कमी झाले आहे, पण ट्रेकर्स नसलेल्या लोकांनाही आता हा किल्ला पाहता येईल. पायथ्यापासुन किल्याचा माथा गाठायला साधारण एक तास पुरेसा आहे. सर्वात जास्त दमछाक होते ते शेवटच्या ५०-६० पायर्‍या चढताना. गडावर भरपूर पाण्यच्या टाक्या खोदलेल्या आढळतात. गडाचा घेरा मोठा असल्याने संपूर्ण गड ४-५ तासात पाहुन होतो.

किल्याविषयी:
इतिहासः
१) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले.
२) दुसरा बुर्‍हाण निजामशाह (इ.स. १५९०-१५९४) हा सातवा निजाम. याचा नातु बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता.
३) १६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला, त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला.
४) मे १६७२ पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले.
५) या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत-चामुंड, चाऊंड, चावंड- ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत. चुंड- हे निजामशाही आमदानीतील नाव आहे. प्रसन्नगड-हे शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव. मलिक अहमदने शिवनेरी जिंकल्यावर आपल्या एका सरदाराच्या हाती हा किल्ला दिला. या किल्ल्यातही भरपूर लुट त्याच्या हाती आली. जोंड किल्ल्याचीही व्यवस्था आपल्या एका सरदाराच्या हाती सोपवून त्याने लोहगडाकडे आपला मोर्चा वळवला. संदर्भ - अहमदनगरची निजामशाही मलिक अहमदच्या अधिकारापुढे नमूद केलेल्या किल्ल्यांच्या अधिकाऱ्यांनी मान झुकवली नव्हती. त्यांचा पाडाव करण्यासाठी त्याने कूच केले. ते किल्ले म्हणजे- चावंड, लोहगड, तुंग, कोआरी, तिकोणा, कोंढाणा, पुरंदर, भोरप, जीवधन, मुरंजन, महोली आणि पाली. हे सर्व किल्ले त्याने बळाचा वापर करून आपल्या ताब्यात घेतले. संदर्भ - गुलशने इब्राहिमी आदिलशाहच्या सैन्याशी लढताना इब्राहीम निजामशाहच्या मस्तकात गोळी लागून तो ठार झाला. निजामशाही वकील मिया मंजू याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले. त्याचवेळी त्यांने इब्राहीमच्या अल्पवयीन मुलाची म्हणजे बहादूरशाहची चावंडला बंदिवासासाठी रवानगी केली. चांदबीबी ही बहादूरशाहची आत्या. मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले. पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे हे सिद्ध झाले. निजामशाही सरदार इख्लासखान याने चावंड किल्ल्याच्या सुभेदाराला राजपुत्र बहादूर याला आपल्या हवाली करण्यास हुकुम पाठवला. या हुकुमाचे पालन मिया मंजू याच्या लेखी आज्ञेशिवाय होणार नाही असे सुभेदाराने कळवले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला. मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले. मुराद अहमदनगरच्या किल्ल्यावर चालून आला. आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला. त्याने अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले. मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहा यांना मदतीस बोलावण्यास अहमदनगरच्या बाहेर पडला. चांदबीबीने याचा फायदा उठवीत त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला. आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची मुक्तता करत त्याची सुलतान म्हणून ग्वाही दिली.
(साभार: विकी)

Sunday, 6 April 2014

"हुस्न पहाडोंका..."


ये चोटियाँ बरफ़ों की हैं आज़ादी का परचम
हँसती है ग़ुलामी पे ये इनसान की हरदम
देती है आकाश को बाँहों का सहारा
ये वादी-ए-कश्मीर है जन्नत का नज़ारा

आपल्या भारताला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले आहे. त्यातही यातील पर्वतरांगा म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. सह्याद्री, हिमालय, कांचनगंगा, काराकोरम, अरवली, निलगिरी, सातपुडा, विंध्य आणि अशा कितीतरी. प्रत्येकाच रूपडं वेगवेगळं.काहींचे रौद्रभीषण तर काहींचे नाजुक सौंदर्य. यात हिमालयाचे सौंदर्य तर वर्णनातीत. कुणाच्या मते हिमालय हा गाळाने बनलेला पर्वत आहे तर कुणाच्या मते  देवांनी निर्माण केलेला. काहि म्हणा पण जगातील सर्वात तरूण हिमालयाची खुबसुरती काही औरच.


 कभी कभी बेजुबान परबत बोलते है
परबतोंके बोलने से दिल डोलते है...... 

माझ्या लेह-लडाख भटकंतीत टिपलेल्या श्रीनगर (जम्मु कश्मिर) पासुन मनाली (हिमाचल प्रदेश) पर्यंतच्या परबतांची हि चित्रसफर.


येथे झुकल्या गर्विष्ठ माना....
टायगर हिल, पॉईन्ट ५१४० (कॅप्टन विक्रम बत्रा पॉईन्ट)
(कॅप्टन विक्रम बत्रा (९ सप्टेंबर १९७४ - ७ जुलै १९९९) हे भारतीय सेनादलातील एक अधिकारी होते. ६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात पॉइंट ५१४०, पॉइंट ४८७५, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला.)
कॅप्टन बत्रा यांचे एक प्रसिद्ध वाक्य  "एकतर तिरंगा फडकवून येईन नाहीतर तिरंगा लपेटून येईन (शहीद होऊन) पण नक्की येईन".