सुट्ट्या आणि पर्यटन म्हटलं की लक्झरी बस, ट्रेन, विमान हि वाहनं आणि त्यांच्या बुकिंगची धांदल आलीच. पण महाराष्ट्रातल्या अंतर्भागातील्या एखाद्या किल्ल्याच्या किंवा जंगलाच्या भटकंतीला जाताना एका विशिष्ट टप्प्याच्या पुढी हि "आपली" वाहनं कामाची नसतात. तिथे त्यांची जागा घेतात ग्रामीण भागातील "हिट" वाहनं. फाईव्ह-स्टार हॉटेलमधलं जेवण आणि धाब्यावरचं जेवण यांच्यात जो फरक आहे, तोच या दोन्ही प्रकारच्या प्रवासांमध्ये आहे. शहरी थाटमाट आणि ऐषोआरामापासुन कोसो दूर असलेल्या या ग्रामीण वाहनांमधून केलेले प्रवास भटक्यांच्या कायम स्मरणात राहतील असेच असतात.
सुट्टीत कोकणातल्या गावी जायचे बेत आखले जातात आणि मग आठवते ती एस.टी! एस.टी.वरचा कोकणप्रवासाचा भार कोकण रेल्वेने हलका केलेला असला, तरी आजही कोकणातल्या अंतर्भागातली गावं गाठायची तर एस.टी.ला पर्याय नाही.
एस.टी.चा हा सुपरिचित लाल डब्बा म्हणजे आजही "गाववाल्या पावन्यां"साठीची जीवनवाहिनीच. या प्रवासात "झुकझुकु आगीनगाडी"ची मजा नसेल, पण पळती झाडही दाखवते आणि मामाच्या गावालाही नेऊन पोहोचवते.
जलदुर्ग पर्यटनला जाताय? मग शक्य तेव्हढं अंतर एस.टी. ने काटुन पुढे एखाद्या बैलगाडीतुन समुद्रकिनारा गाठण्याची आणि तिथुन पुढचा प्रवास मासेमारीच्या बोटीतुन किंवा शिडाच्या होडीतुन करण्याची कल्पना कशी वाटाते? अशी मजल-दरमजल करत इप्सित ठिकाण गाठण हि तर सह्याद्रीतल्या भटकंतीची खासियत.
"केवल मनुष्यप्राणियों के लिए" असं काही या ट्रकवर लिहिलेलं नाही. मग बैलाने हि संधी का सोडावी? त्या निमित्ताने टपावर बसलेल्या प्रवाशांसाठीही जरा वेगळा अनुभव....!
"पिटातले" प्रवासी भवतालचा निसर्ग मनमुरादपणे निरखत निघाले आहेत! मागे बसलेल्या (कि उभ्या?) मंडळींना हि लक्झरी नाही!
तालुक्याच्या गावास्न आपली वाडी आट-धा किलोमीट्रावर तर हाये! मंग कशाला पायचे बसायला जागान् बिगा?
या "प्रवरा-एक्सप्रेसची" सर राजधानी एक्सप्रेसलाही नाही!
जलवाहतुक आणि रस्तेवाहतुक यांच अस्सल "कंट्री-स्पेशल फ्युजन"! फ्युजन केवळ संगीतातच असतं म्हणुन कुणी सांगितलं?
खेडोपाड्यातील या वाहनांची सफर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर मग लागा तयारीला आणि निघा प्रवासाला.......
पूर्वप्रसिद्धी - 'मुशाफिरी' (दिवाळी अंक, नोव्हेंबर २०१५)