Saturday, 15 March 2014

मुक्त मी . . . . विमुक्त मी

नेहमीच्या त्याच त्याच रूटिनचा कंटाळा आलेला. त्यातच रोजच्या कामाचे आणि इतर गोष्टींचे टेंशन, तोच रोजचा ताणतणाव. विचार केला निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवतो. असंही भटकंतीची आवड आहेच. बघु जरा निसर्गाच्या सान्निध्यात थोडातरी ताण तणाव कमी होतो का? असा विचार मनात आला आणि निघालो त्याच्यासोबत काही क्षण व्यतित करण्याकरीता.

तशी सह्याद्रीची ओढ पहिल्यापासुनच. त्याच्या संगतीत फिरताना मनावरचा ताण थोडा कमी होतो, म्हणुन त्याच्यासोबत काही वेळ राहण्यासाठी निघालो. वाटेत एका ठिकाणी दरीत स्वतःला झोकुन देणारे काही धबधबे दिसले. ज्या चैतन्याने, उत्साहाने ते स्वत:ला दरीत झोकुन देत होते ते पाहुन न राहवून त्यांना विचारले, "तुमच्या आनंदाचे आणि चैतन्याचे कारण काय?" त्यावर ते म्हणाले, "पावसाळ्याचे काही दिवसच आम्ही तुम्हाला दिसतो, हे काही महिन्याचेच आमचे अस्तित्व असते. कधी आमचे रूप धडकी भरवणारे असते तर कधी डोळ्यांना सुखावणारे. डोंगरमाथ्यावरून उड्या मारत, नाचत आम्ही बागडत असतो. याच कालावधीत आम्ही पुढे पुढे जात नदी/ओढ्याला मिळतो आणि काठावरची गावं समृद्ध करत पुढे पुढे चालत राहतो. या कमी आयुष्यात आम्हाला अनेकांचे जीवन फुलवायचे असते आणि काही महिने तरी तेच काम करायला मिळणार याचा आम्हाला आनंद असतो.
.....................माझ्या मनातील मरगळ दूर झाली. 





काही क्षण पुढे चालत असताना काही रानफुले वार्‍यावर आनंदाने डोलताना दिसले. न राहवून विचारले, "तुम्हाला, असं एकांतात रानावनात राहताना वाईट नाही वाटतं? तुमच्याच सारखी गुलाब, मोगरा, जाई-जुई, शेवंती अशी अनेक इतर फुले मात्र देवघरात पुजेसाठी, प्रेमाचे प्रतिक आणि अशा विविध कामासाठी वापरली जातात आणि तुम्ही मात्र इकडे एकटेच सहसा कुणाच्याही नजरेस न दिसता रहात असता. तुम्हाला त्या फुलांबद्दल इर्षा नाही वाटतं." यावर रानफुल उत्तरले, "आमचं आयुष्य हे काही काळापुरतंच असंत आणि त्यातलाच काळ जर हेवेदावे आणि मत्सर करण्यात घालवला तर हे सुंदर आयुष्य कधी उपभोगायचे? जे आहे, जितके आहे त्यातच समाधान मानायचे हिच आमची वृती.
.....................माझ्यातील "मत्सर, इर्षा" नावाच्या काटेरी फुलाचे निर्माल्य झाले.



 फिरता फिरता एका जागी जरा विसाव्यासाठी बसलो असता अचानक हातच्या बोटावर एक सुंदर फुलपाखरू येऊन बसले. थोडी गंम्मत वाटली. त्याच्या धिटाईचे कौतुक करत विचारले, "तुला भिती नाही वाटली, थेट एका मनुष्याच्या हातावर येऊन बसलास?" त्यावर ते निरागसपणे म्हणाले, "नाही रे भीती नाही वाटली. खरं तर प्रत्येकाच्या मनात थोडीतरी भीती असतेच, पण त्यामुळे या सुंदर आयुष्याचा उपभोग घ्यायचा नाही का? जी गोष्ट व्हायची आहे ती कधी ना कधी होणारच, पण त्यामुळे आपण आपले सुखाचे क्षण असे भीतीच्या दडपणाखाली का वाया जाऊ द्यायचे? आम्ही आनंदात इकडे तिकडे, फुलांवर बागडत आयुष्याचा पुरेपुर उपभोग घेत असतो.
.....................माझ्या मनात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची भीती दूर गेली.


 एका बागेत सहजच फिरत असताना एक सुंदरस झाड दिसल. नीट पाहिलं असता त्या झाडाची सावली त्याच्यापासुन दूर गेलेली दिसली. उन्हात उभ्या असलेल्या त्या झाडाला पाहून म्हटल, "तुला उन्हात उभे करून तुझी सावली तुझ्यापासुन दूर गेली, आमचंही असंच असतं रे संकट आले कि सगेसोयरे, मित्रमैत्रीणी दूर जातात". यावर ते झाड म्हणाल, "मित्रा चुकतोयस तु. जर नीट पाहिलंस तर माझी सावली माझ्याजवळच आहे. तुमचंही असंच असत संकटात सगेसोयरे, मित्रमैत्रीणी हे तुमच्या सभोवतीच असतं पण त्या आलेल्या संकटामुळे तुम्ही इतके बावरून गेलेले असतात कि आजुबाजुला असलेल्या तुमच्या हितचिंतकांकडे तुमचे लक्षच नसते आणि त्यांनी तुमची साथ दिली नाही हे जाणुन त्यांच्याबद्दल तुमच्या मनात संशय निर्माण होतो.
.....................माझ्या मनात असलेले संशयाचे किल्मिष दूर झाले.



भटकता भटकता एका देवळात गेलो, पुजेची थाळी घेतली, देवाच्या पाया पडुन थोडावेळ बाहेर बसलो, थाळीत असलेला साखरेचा फुटाणा उचलण्याच्या प्रयत्नात असलेली एक मधमाशी दिसली. बराच वेळ तिच्याकडे बघत बसलो. तो इवलासा जीव त्या साखरेच्या दाण्याला उचलण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. सुरुवातीच्या अपयशानंतर काहीवेळाने तो दाणा उचलण्यात तिला यश आले आणि ते घेऊन ती उडुन गेली. तिच्या या धडपडीचे आणि प्रयत्नांचे कौतुक वाटले. छोट्यामोठ्या अपयशाने खचुन जाणार्‍यांनी निश्चितच यातुन शिकले पाहिजे.
तिथेच जवळच एका झाडाच्या एका सुक्या फांदीवरून काही मुंग्या लगबगीने आणि तितक्याच शिस्तीने ये जा करत असल्याचे दिसल्या, त्यातल्या एकीची वाट अडवून विचारले, "मुंगीबाई, कसली हि लगबग आणि एव्हढ्या शिस्तीत कसलं काम करत आहात?" त्यावर ती म्हणाली, "सतत काहीना काही काम करत राहणे हेच आमचं जीवन, सध्या पावसाळ्यापूर्वीच्या बेगमीची तयारी चालु आहे. थांबायला आम्हाला वेळच नाही. आमचं जीवन थोडं आणि काम अफाट आहे. शिस्तीचं विचारलंस तर ती आम्हाला कुणी शिकवत नाही, जन्मापासुनच आम्हाला ती उपजत हे. "तुझ्याशी बोलायला मला जास्त वेळ नाही, चिक्कार कामं आहेत" असं बोलुन ती निघुन गेली.
.....................माझ्यातील आळस आणि अपयशाने खचुन जाणारी वृत्ती निघुन गेली.



देवळातुन बाहेर आलो, तेथे एक पणती टिमटिमत होती. तिच्या ज्योतीकडे पाहत मी उद्गारलो, "दुसर्‍यांच्या जीवनात प्रकाश देण्याकरीता तु का झिजतेस"? यावर ती म्हणाली, "दुसर्‍यांना आनंद देण्यात जर आपलं आयुष्य कामी आलं तरी बेहत्तर असं मानणारे आम्ही इतरांना सुख देण्यातच समाधान मानतो. तुला एका कवितेतील काही ओळी आठवतात का? 
 "फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?
घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी!"
अंधारलेल्या आकाशात शुक्राचा एक तारा जसा तेजाने लखलखत असतो तसंच निराश मनाला आशेची एक ज्योतच आत्मविश्वास देऊन जाते. निराश चेहर्‍यावरचे आशेचे हसु पाहताना आम्हाला आमच्या नष्ट होणार्‍या अस्तित्वाची काळजी नसते. आमच्या मरणातच खरी अमरता दडली आहे.





 थोडं पुढे जाताच पाण्याचे काही फुगे दिसले. एकटक त्यांच्याकडे पहात असताना त्यातीलच एकाने विचारले, "बघतोस काय असा?" तुझ्यातलाच एक अंश मी आहे. माझं नाव "अहंकार", काही लो़क मला "गर्व" या नावानेही ओळखतात. इंग्रजीत तर "EGO" असंही एक गोंडस नाव आहे. तुम्हीही माझेच लाड करतात, मला गोंजारतात/कुरवाळतात कारण आहेच "मी" सर्वश्रेष्ठ. मला इतरांशी काही घेणं देणं नाही. हे सगळं ऐकतच होतो अशातच एका लहानग्याने टाचणीने ते सगळे फुगे फोडले. गर्वाचा, अहंकाराचा ते फुगे काहि क्षणातच होत्याचे नव्हते झाले. विचार करू लागलो, या सगळ्या गोष्टी जर क्षणभंगुर आहेत तर मी त्या माझ्यात का बाळगुन आहे. याचा मला काही फायदा तर होत नाहीच पण झालेच तर माझे नुकसानच जास्त होतंय.
.....................माझ्यातील गर्वाचा, अहंकाराचा फुगा क्षणातच फुटला.


एका उद्यानात फिरताना झाडाच्या एका खोडावर एक इवलसं सुंदर फुल फुललेलं दिसल. त्या झाडाला विचारलं, "कशाला या फुलाच ओझ वाहवतो आहेस. आधीच तुझ्या अंगावर पाने आणि फांद्या यांचा विस्तार आहे, येणार्‍या जाणार्‍यांना सावली,फळे द्यायचे कामे आहे. त्यात कुठे या छोट्याशा फुलाला सांभाळत बसलायंस." यावर ते झाड म्हणाले," अरे हे छोटेसे फुल, पाने, फांद्या माझीच जबाबदारी आहे. या सर्व कुटुंबाचा मी प्रमुख आहे. मी माझी जबाबदारी कशी झटकु शकतो. आणि तुमच्याप्रमाणे स्वत:ची जबाबदारी दुसर्‍यांवर टाकण्याची आमची सवय नसते रे. त्याचप्रमाणे माझ्या सावलीत येणार्‍या वाटसरूंनाही सावली, मधुर फळे देणे हे सुद्धा मी माझे कर्तव्यच मानतो. त्याक्षणी मला एक संस्कृत श्लोक आठवला
"छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे । फलान्यापि परार्थाय वृक्षा: सत्पुरुषा: इव"

.....................आणि त्या सत्पुरुषाचे विचार ऐकुन माझ्यातील छोट्या छोट्या जबाबदार्‍या दुसर्‍यावर झटकण्याची सवय निघुन गेली.


 समुद्राच्या किनार्‍यावर शांतपणे गाज ऐकत बसलो होतो. विचार आला इतका विशाल हा समुद्र, स्वतःच्या पाण्याचे बाष्प करून पावसाच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य देतो, याच्यात असलेल्या कितीतरी गोष्टींमुळे आपले जीवन समृद्ध झाले आहे. हा खर्‍या अर्थाने रत्नाकर आहे, पण आपण बदल्यात याला काय देतो? टाकाऊ पदार्थ, घातक रसायने यात सोडुन त्याने केलेल्या उपकाराचे परतफेड करतो. माझ्या मनातील विचार त्याला कळले, तो म्हणाला, "परोपकार हि आमची वृत्तीच आहे रे. कुणी काहीतरी द्यावे म्हणुन आम्ही मदत करत नाही, सगळ्यांना मदत करणे हा आमचा स्थायीभावच आहे. उदारपणा हा आम्हाला जन्मजातच आहे. जे काही लोक आम्हाला समर्पित करतात ते आम्ही विनम्रपणे स्विकारतो.
.....................माझ्यात परोपकार आणि विनम्रपणा आला.



खरोखरं गर्व, अहंकार, आळस, बेजबाबदार, निराशा, आळस, अपयश, मत्सर या रिपूंना दूर ठेवून परोपकार, विनम्रपणा, उत्साह, आशा या फुलांची योग्य रीतीने गुंफण केली असता दिसणारा "आयुष्याचा गजरा" हा मनमोहकच असणार.
 निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना पुन्हा एकदा सिद्ध झाले कि सर्वात मोठा शिक्षक निसर्गच आहे. निसर्गाचे घटक आणि आपल्या सभोवती असलेल्या कित्येक गोष्टींपासुन खूप काही शिकता येते, फक्त तुमची नजर तेव्हढी तयार असली पाहिजे. आज त्याच्या सोबतीत वाईट गोष्टींचा त्याग करून आणि चांगल्या गोष्टींचा स्विकार करून खर्‍या अर्थाने झालो "मुक्त मी . . . . विमुक्त मी"





4 comments:

  1. मानसी पटवर्धन31 March 2014 at 08:03

    देता किती घेशील दोन करांनी...असे वाटायला लावणारा हा निसर्ग! याची प्रचीती लेख वाचताना येते. छान!

    ReplyDelete
  2. पहिला फ़ोटो पाहून एकदम ताजंतवानं वाटलं.

    ReplyDelete