Sunday, 30 March 2014

चैत्रचाहूल

"वेळ झाली भर मध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन" सध्या सर्वत्र अशीच स्थिती आहे आणि सर्वांचीच अवस्था "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी झालेली आहे. याला कारण नुकताच सुरू झालेला कडक उन्हाळा. उन्हामुळे नकोनकोसा वाटणारा प्रवास, उष्णतेमुळे जिवाची होणारी काहिली, घामामुळे चिपचिपलेले अंग यामुळे हा ऋतु सार्‍यांनाच नकोसा वाटतो. पण याच दरम्यान चैत्रमासात एक जादूगार आपली जादूची कांडी सर्वत्र फिरवत असतो आणि तो जादूगर म्हणजेच "निसर्ग".

हेमंत आणि शिशिर ऋतुच्या आगमनाने झाडांवरची पानं हळुहळु गळु लागतात. एकेकाळी हिरवा पर्णसंभार मिरवणार्‍या या वसुंधरेची अशी विपन्नावस्था आपल्याला बघवत नाही. सगळीकडे हि धरती अशीच निष्पर्ण, उजाड आणि उदास बसुन आपल्या प्रियकराची, ऋतुराज "वसंताची" वाट पाहत असते आणि अचानक तिला त्याच्या आगमनाची चाहुल लागते. हा ऋतुराजही आपल्या आगमनाची वर्दी देण्यासाठी सर्वप्रथम आपल्या दुताला भुतलावर पाठवतो आणि सांगतो, " गा कोकिळा, गा रे, भूलोकीच्या गंधर्वा तु अमृतसंगीत गा रे....." आणि कोकिळही या भुतलावर येऊन आपले काम चोख बजावतो. वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच त्याला भेटायला आतुर असलेल्या धरतीची लगबग सुरू होते. हळुहळु झाडांवरच्या फांद्यांना कोवळी, लुशलुशीत पालवी फुटायला लागतात आणि एखाद्या अल्लड मुलीचे नवयौवनेत रूपांतर व्हावे असे हे वृक्ष दिसु लागतात/सजु लागतात. बघता बघता या वृक्षांना कळ्या धरू लागतात, काही कालावधीनंतर त्यांचे फुलात रूपांतर होऊन संपूर्ण वृक्षच फुलांचे घोस मिरवत आपले लक्ष वेधून घेतो. काहि दिवसांपूर्वी अंगावर वस्त्रे नसलेली पुरंध्री नखशिखांत सुवर्णालंकारांनी मढवावी असेच हे वृक्ष पुष्पसंभारांनी लगडलेले दिसु लागतात. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी धरतीही नटु लागते. गडद, हळदी सोनमोहराचा शालू नेसुन, त्यावर मातकट किंवा हलक्या पोपटी रंगाची चोळी परीधान करून, शाल्मली, पंगारा, पळस यांचा लाल/शेंदरी मळवट कपाळी लावून, कानात हलक्या पिवळ्या रंगाच्या बहाव्याचे झुबकेदार कर्णफुले घालुन, अंजन, नीलमोहराचा निळसर साज गळ्यात घालुन, पायात पिवळ्या टॅबेबुयाचे पैंजण बांधून, हातात फिक्कट गुलाबी रंगाच्या कॅशियाची कांकणे लेउन, नाकात पाचुंदाची नथ आणि केसात विविध चाफ्याचा फुलांचा गजरा माळुन, बकुळीच्या मंद सुवासाचे अत्तर लावून, असा सारा साजश्रृंगार करून ती प्रियकर वसंताला भेटण्यासाठी तयार होत असते. या दोघांच्या प्रेमाचा हा उत्सव सगळ्यांनाच सुखावून देणारा असतो आणि तो पाहण्यासाठी मुद्दाम कुठे जायची गरज नसते. आपल्या आजुबाजुला, टेकड्यांवर, शहराबाहेर/गावाबाहेर, माळरानावर, डोंगरदर्‍यांमध्ये यांची कुठेही पाहिलं तरी यांची प्रणयराधना चालु असते. हा उत्सव महिनाभर चालु असतो. वसंताला निरोप देत, या प्रेमउत्सवाची सांगता करत, वैशाख वणव्याचे आव्हान स्विकारत पावसाळा सुरू होईपर्यंत शेवटी बहरतो तो "गुलमोहर".

या ऋतुराजाचे कौतुक सगळ्यांनाच. ऐन वसंतात लाल, पिवळ्या, निळ्या-जांभळ्या, केशरी रंगाने बहरलेले वृक्ष पाहिल्यावर छायाचित्रकाराला त्याच्या कॅमेर्‍यात, चित्रकाराला त्याच्या कॅनव्हॉसवर आणि गीतकाराला त्याच्या लेखणीत कैद करावेसेच वाटणार. निसर्गाच्या या रंगपंचमीची भुरळ आपल्या मराठी कविंनाही न पडली तर नवलच. हि "गानभूल" आपल्या कवींना देखील पडली आहे आणि ती का पडु नये? इतक्या सुंदर दृष्याला/वातावरणाला गद्यात का कैद करावे?


African tulip flowers/Spathodea

African tulip flowers/Spathodea

पळस

पळस

गुलाबी तामण

शाल्मली/काटेसावर

शाल्मली/काटेसावर

कुसुम/कुसुंब फुलोरा


गुलाबी टॅबेबुया

कनकचंपा/रामधनचंपा

एडेनियम

अंजनी

अंजनी

लसुणवेल

शिवण (गंभारी)

मुचकुंद


पांढरा बहावा

Castanospermum australe

Roupellina boivinii Apocynaceae

उर्वशी

उर्वशी

पर्जन्यवृक्ष

पीतमोहर/सोनमोहर

वरूण/वायवर्ण

पांढरा बहावा

पिवळा टॅबेबुया

गुलाबी तामण

बहावा (अमलताश)
गुलमोहर

10 comments:

  1. निव्वळ अप्रतिम.... _/\_
    तो पहिला फ़ोटो, नक्की काय प्रकार आहे? काय केले आहेस तिथे?

    ReplyDelete
  2. मानसी पटवर्धन31 March 2014 at 07:39

    मस्त फोटो व फुलांची विविधताही.

    ReplyDelete
  3. वॉव, सुरेख, छान आहे नवीन वर्षाची भेट. धन्यवाद.

    ReplyDelete
  4. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!! :-)

    तो पहिला फ़ोटो, नक्की काय प्रकार आहे? काय केले आहेस तिथे?>>>>विशाल, ते दोन फोटो एकत्र (इम्पोज) केले आहेत. :-)

    ReplyDelete
  5. सर्व फ़ोटो मस्तच आहेत. खूप खूप शुभेच्छा :)

    ReplyDelete
  6. सुंदर! आता आम्हाला मेजवानी. :स्मित:

    ReplyDelete
  7. Mast aahe blog! Abhinandan ani shubhechha!! :-)

    ReplyDelete
  8. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!

    ReplyDelete
  9. photo khupch mast ... nehmipramane...khuppppppp sarya shubechha.....

    ReplyDelete