Sunday, 30 March 2014

चैत्रचाहूल

"वेळ झाली भर मध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन" सध्या सर्वत्र अशीच स्थिती आहे आणि सर्वांचीच अवस्था "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी झालेली आहे. याला कारण नुकताच सुरू झालेला कडक उन्हाळा. उन्हामुळे नकोनकोसा वाटणारा प्रवास, उष्णतेमुळे जिवाची होणारी काहिली, घामामुळे चिपचिपलेले अंग यामुळे हा ऋतु सार्‍यांनाच नकोसा वाटतो. पण याच दरम्यान चैत्रमासात एक जादूगार आपली जादूची कांडी सर्वत्र फिरवत असतो आणि तो जादूगर म्हणजेच "निसर्ग".

हेमंत आणि शिशिर ऋतुच्या आगमनाने झाडांवरची पानं हळुहळु गळु लागतात. एकेकाळी हिरवा पर्णसंभार मिरवणार्‍या या वसुंधरेची अशी विपन्नावस्था आपल्याला बघवत नाही. सगळीकडे हि धरती अशीच निष्पर्ण, उजाड आणि उदास बसुन आपल्या प्रियकराची, ऋतुराज "वसंताची" वाट पाहत असते आणि अचानक तिला त्याच्या आगमनाची चाहुल लागते. हा ऋतुराजही आपल्या आगमनाची वर्दी देण्यासाठी सर्वप्रथम आपल्या दुताला भुतलावर पाठवतो आणि सांगतो, " गा कोकिळा, गा रे, भूलोकीच्या गंधर्वा तु अमृतसंगीत गा रे....." आणि कोकिळही या भुतलावर येऊन आपले काम चोख बजावतो. वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच त्याला भेटायला आतुर असलेल्या धरतीची लगबग सुरू होते. हळुहळु झाडांवरच्या फांद्यांना कोवळी, लुशलुशीत पालवी फुटायला लागतात आणि एखाद्या अल्लड मुलीचे नवयौवनेत रूपांतर व्हावे असे हे वृक्ष दिसु लागतात/सजु लागतात. बघता बघता या वृक्षांना कळ्या धरू लागतात, काही कालावधीनंतर त्यांचे फुलात रूपांतर होऊन संपूर्ण वृक्षच फुलांचे घोस मिरवत आपले लक्ष वेधून घेतो. काहि दिवसांपूर्वी अंगावर वस्त्रे नसलेली पुरंध्री नखशिखांत सुवर्णालंकारांनी मढवावी असेच हे वृक्ष पुष्पसंभारांनी लगडलेले दिसु लागतात. आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी धरतीही नटु लागते. गडद, हळदी सोनमोहराचा शालू नेसुन, त्यावर मातकट किंवा हलक्या पोपटी रंगाची चोळी परीधान करून, शाल्मली, पंगारा, पळस यांचा लाल/शेंदरी मळवट कपाळी लावून, कानात हलक्या पिवळ्या रंगाच्या बहाव्याचे झुबकेदार कर्णफुले घालुन, अंजन, नीलमोहराचा निळसर साज गळ्यात घालुन, पायात पिवळ्या टॅबेबुयाचे पैंजण बांधून, हातात फिक्कट गुलाबी रंगाच्या कॅशियाची कांकणे लेउन, नाकात पाचुंदाची नथ आणि केसात विविध चाफ्याचा फुलांचा गजरा माळुन, बकुळीच्या मंद सुवासाचे अत्तर लावून, असा सारा साजश्रृंगार करून ती प्रियकर वसंताला भेटण्यासाठी तयार होत असते. या दोघांच्या प्रेमाचा हा उत्सव सगळ्यांनाच सुखावून देणारा असतो आणि तो पाहण्यासाठी मुद्दाम कुठे जायची गरज नसते. आपल्या आजुबाजुला, टेकड्यांवर, शहराबाहेर/गावाबाहेर, माळरानावर, डोंगरदर्‍यांमध्ये यांची कुठेही पाहिलं तरी यांची प्रणयराधना चालु असते. हा उत्सव महिनाभर चालु असतो. वसंताला निरोप देत, या प्रेमउत्सवाची सांगता करत, वैशाख वणव्याचे आव्हान स्विकारत पावसाळा सुरू होईपर्यंत शेवटी बहरतो तो "गुलमोहर".

या ऋतुराजाचे कौतुक सगळ्यांनाच. ऐन वसंतात लाल, पिवळ्या, निळ्या-जांभळ्या, केशरी रंगाने बहरलेले वृक्ष पाहिल्यावर छायाचित्रकाराला त्याच्या कॅमेर्‍यात, चित्रकाराला त्याच्या कॅनव्हॉसवर आणि गीतकाराला त्याच्या लेखणीत कैद करावेसेच वाटणार. निसर्गाच्या या रंगपंचमीची भुरळ आपल्या मराठी कविंनाही न पडली तर नवलच. हि "गानभूल" आपल्या कवींना देखील पडली आहे आणि ती का पडु नये? इतक्या सुंदर दृष्याला/वातावरणाला गद्यात का कैद करावे?


African tulip flowers/Spathodea

African tulip flowers/Spathodea

पळस

पळस

गुलाबी तामण

शाल्मली/काटेसावर

शाल्मली/काटेसावर

कुसुम/कुसुंब फुलोरा


गुलाबी टॅबेबुया

कनकचंपा/रामधनचंपा

एडेनियम

अंजनी

अंजनी

लसुणवेल

शिवण (गंभारी)

मुचकुंद


पांढरा बहावा

Castanospermum australe

Roupellina boivinii Apocynaceae

उर्वशी

उर्वशी

पर्जन्यवृक्ष

पीतमोहर/सोनमोहर

वरूण/वायवर्ण

पांढरा बहावा

पिवळा टॅबेबुया

गुलाबी तामण

बहावा (अमलताश)
गुलमोहर

Saturday, 22 March 2014

गर्द हिरवाईतील श्री केशवराज

डिसेंबर महिन्यात आलेल्या सलग सुट्टींचा फायदा उचलत आम्ही दापोली भटकंतीचा कार्यक्रम आखला. तालुक्याचे ठिकाण असलेले हे शहर थंड आणि आल्हाददायक वातावरणामुळे "कोकणचे महाबळेश्वर" म्हणून ओळखले जाते. सुप्रसिद्ध कोकण कृषी विद्यापीठ असलेल्या ह्या शहरास विलोभनीय समुद्रकिनारे, किल्ले, प्राचीन लेणी यांची साथ लाभली आहे. कोणीही ह्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात पडावे असा हा परिसर. कोकणचा कॅलीफोर्निया जेव्हा होईल तेव्हा होईल पण कॅलीफोर्नियाला "टफ" द्यावे असे निसर्गसौंदर्य कोकणचे नक्कीच आहे. अशा या दापोली शहरास भेट दिली आणि कायम स्मरणात राहिले ते आसुद येथील "श्री केशवराज मंदिर आणि तेथील परिसर".




दापोलीपासून अंदाजे ६/७ किमी अंतरावर आसुद बाग हे गाव आहे. श्री. ना. पेंडसे यांच्या "गारंबीचा बापु" या कादंबरीत जसे वर्णन केले आहे तसेच हे सुंदर आसुद गाव. या गावतुनच सुरूवात होते ती श्री केशवराज मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेची. मुख्य रस्त्याला गाडी ठेवून आपण दाबकेवाडीतून श्री केशवराजच्या वाटेकडे निघतो. केशवराजच्या मार्गावर ठिकठिकाणी मार्गफलक असल्याने वाट चुकण्याचा जराही संभव नाही. मंदिराकडे जाणारी हि वाट खुप सुंदर आणि प्रफुल्लित करणारी आहे. सकाळची मन प्रसन्न करणारी वेळ, दोन्ही बाजुंना आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा, आंबा-फणसाची गर्द झाडी आणि त्यातून चुकारपणे धरतीवर येणारी सूर्यकिरणे,कौलारू घरे, लाल मातीची पायवाट आणि त्याचबरोबर आपली सोबत करणारे पाटाचे खळाळते पाणी हे सर्व म्हणजे निसर्गदेवतेने काढलेले एक सुंदर निसर्गचित्रच. अगदी "मंझिल से बेहतर लगने लगे है ये रास्ते" असे म्हणण्याइतका हा परिसर मस्त आहे. कधी कधी असे होते कि मूळ ठिकाणापेक्षा त्याचा प्रवास हा सुंदर वाटतो (अर्थात आपली "मंझिल" हि त्या "सफर" इतकीच अप्रतिम आहे हे त्या केशवराजच्या मंदिरात गेल्यावरच कळते).


वाटेतला निसर्ग बघत आणि चढ उतार पार करत आपण पोहचतो ते आसव नदिच्या पुलाजवळ. पूर्वी या नदीवर एक लाकडी पूल होता. सध्या देवधर कुलबंधुंनी तसेच श्री केशवराज कुलदैवत असलेल्या कुलातील काही भक्तमंडळींनी दिलेल्या देणगीतून व स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने येथे मजबुत पूल बांधण्यात आला आहे. जुन्या लाकडी पुलाचे अवशेष आजही येथे पाहवयास मिळते. नदी ओलांडून पाऊलवाटेने टेकडी चढून आपण पोहचतो ते श्री केशवराजच्या मुख्य मंदिरात. चारही बाजुला गर्द झाडीत वसलेल्या पुरातन अशा या मंदिराला काढलेल्या रंगामुळे त्याच्या मूळ सौंदर्याला कुठेही बाधा येत नव्हती उलट गर्द हिरव्या वनराईत ते अधिक उठून दिसत होते. श्री केशवराज हे विष्णुचे एक रूप. मंदिराच्या पुजार्‍यांनी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर हे पांडवकालीन असून पांडवांनी ते एका रात्रीत बांधल्याची आख्यायिका आहे. असेच एक पांडवांनी बांधलेले शंकराचे मंदिर बुरोंडी या गावी आहे. केशवराजच्या शेजारी लक्ष्मीची सोन्याची एक मूर्ती होती ती चोरीला गेल्याने सध्या गाभार्‍यात फक्त श्री केशवराजचीच मूर्ती बघावयास मिळ्ते. काळ्या पाषाणातील श्री केशवराजची मूर्ती अतिशय सुबक आहे. मूर्ती चतुर्भुज असून शंख, चक्र, गदा व पद्म अशी आयुधे धारण केलेली आहे. श्वेत वस्त्र परिधान केलेली काळ्या पाषाणातील श्री केशवराजची मूर्ती पाहून आपण नकळतच हात जोडून नतमस्तक होतो.



मंदिराचे बांधकाम हे पुरातन असून आवारात एक दगडी गोमुख आहे. त्यातून बाराही महिने थंड व नितळ पाणी वाहत असते. पुजार्‍यांच्या म्हणण्याप्रमाणे कोकणात कितीही पाण्याचे दुर्भिक्ष असले तरी हे पाणी कधीही आटत नाही. वरच्या डोंगरातून पाटाद्वारे दगडी पन्हाळीतून हे पाणी खाली आणले जाते. पाटाची हि दगडी पन्हाळी सुमारे १०० ते १५० वर्षे जुनी आहे व पाण्याचा स्त्रोत हा एका पुरातन आम्रवृक्षाच्या बुंध्यातून येत असून तेथे जायची वाट थोडीशी निसरडी आहे.  असे म्हणतात कि, "ऋषीचे कुळ आणि नदिचे मूळ" शोधू नये, आम्ही विचार केला कि नदीचे नाही पण निदान या पाटाचे तरी मूळ पाहुया. डोंगराच्या वरच्या बाजुला दाट झाडीत एक वाट जाते त्याच वाटेने थोडे पुढे गेलात कि आपल्याला दिसतो तो पुरातन आम्रवृक्ष आणि त्याच्या बुंध्यातून येणारा पाण्याचा प्रवाह. तेथून तो पोफळीच्या पाटाने आणून तो दगडी पन्हाळीत सोडला आहे. घनदाट झाडी असल्याने आम्ही फार पुढे गेलो नाहि. हा संपूर्ण परिसर पाहवयाचा असेल तर दिड दोन तास अवश्य राखून ठेवावेत.


अनेक कोकणस्थांचे कुलदैवत असलेल्या या श्री केशवराज मंदिरात कार्तिक एकादशीपासून पाच दिवसांचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. अस्सल कोकणी वातावरण, मन प्रसन्न करणारा निसर्ग, श्री केशवराजची मूर्ती यामुळे आपल्याला देवस्थान आणि पर्यटन दोन्ही एकदम केल्याचे समाधान मिळते व आपण परतीच्या वाटेकडे वळतो. मंदिराचे चढ उतार पार करून आपण थकला असाल तर आसुद बाग येथे काही घरात आपल्या अल्पोपहाराची सोय होऊ शकते. थंडगार कोकम, आवळा व करवंद सरबत आपल्या स्वागताला सज्ज असतात. अगोदर सुचना दिल्यास घरगुती जेवणाचीही सोय होऊ शकते.

अस्सल कोकणी मेवा जसे, आंबा-फणसपोळी, नाचणी-पोह्याचे पापड, मँगो जॅम व पल्प, कोकम, आवळा व करवंद सरबत, घरगुती चटण्या, कैरी-करवंदाची वेगवेगळ्या प्रकारची लोणची येथे विक्रिस ठेवली आहेत. खरेदी नाही केली तरी चालेल पण ह्या कोकणी मेव्याची चव घ्या असे सांगणारे प्रेमळ विक्रेते येथे आहेत.

मन प्रफुल्लित करणारी श्री केशवराजची हि भटकंती खरोखर कायम स्मरणात राहणारी आहे. मनात विचार केला कि डिसेंबर महिन्याच्या अखेरीस येथे एवढे निसर्गसौंदर्य बघायला मिळते तर पावसाळ्यात याचे सौंदर्य कसे असेल! परत यायला काहितरी निमित्त लागतेच ना तेव्हा पुढच्या वेळेस पावसाळ्यात येण्याचे मनोमन ठरविले आणि श्री केशवराजचा निरोप घेतला.



Sunday, 16 March 2014

आयुष्यावर बोलु काही . . . .

भटकंतीची आवड पहिल्यापासुनच. सह्याद्रिच्या कुशीत, देवळांच्या परिसरात, समुद्रकिनारी अगदी परदेशातहि मनसोक्त फिरलो. कधी मित्रांसोबत तर कधी फक्त कॅमेर्‍यासोबत. या सर्व भटकंतीमुळे माझ्याहि नकळत फोटोग्राफिचा "तिसरा डोळा" केंव्हा उघडला गेला ते माझे मलाच कळले नाहि. या तिसर्‍या डोळ्याद्वारे मला आता प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसु लागले आहे. बर्‍याचदा असे होते कि, आपण काढलेले फोटो पाहताना वाटते कि, अरे आपलं आयुष्यहि असेच आहे ना?". असेच काहि मी काढलेले फोटो आणि आयुष्य यांची सांगड घालुन काहि फोटो तुमच्यासमोर आणलेले आहे.
तेंव्हा,
जरा चुकिचे, जरा बरोबर बोलु काही
चला दोस्तहो (फोटोद्वारे) आयुष्यावर बोलु काही . . . . .



ज्या रंगाचा चष्मा आपण घालतो त्याच रंगाची दुनिया दिसते. जर उदास, नैराश्याच्या चष्मा घातला तर सगळीकडे फक्त उदासी आणि नैराश्यच दिसेल, याउलट जर प्रसन्नतेचा चष्मा असेल तर सगळं जगच सुंदर दिसेल. अशीच एक प्रसन्न भटकंती करून घरी परतताना लोकल ट्रेनच्या खिडकीवरची कळकट्ट जाळी देखील सुंदर भासली.

"आयुष्य कितीही खडतर असलं तरी ते आनंदाने फुलवत रहा" हे या खडकावरल्या अंकुराकडुन आपणांस शिकता येईल.

"आयुष्य किती क्षणभंगुर आहे" हे ह्या फोटोला पाहिल्यावर मला नेहमीच जाणवणार. एकदा देवळांच्या भटकंतीला गेलो असता पायर्‍यांवर मला हि भेटली. तीचे मस्त फोटोसेशन केल्यानंतर जवळ पास अर्धा पाऊण तास देवळाच्या परिसरात भटकलो. परतीच्या वाटेवरती, या कालावधीत गोगलगायीने किती अंतर पार केले हे पाहण्यासाठी तेथे गेलो असता, कुणाच्यातरी पायाखाली येऊन तीचे अस्तित्वच संपले होते. खुप वाईट वाटले, त्यापेक्षा स्वतःचा राग जास्त आला. वाट वर्दळीची आहे हे माहित असुनही मी तिला जवळच्या झाडीत उचलुन ठेवले असते तर? ...........कदाचित एक जीव वाचला असता. :(


"कट्टा" सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. काहि क्षण मित्रमंडळी एकत्र येणार. गप्पांचे फड रंगणार आणि परत सगळे आपआपल्या मार्गी जाणार. उरणार तो एकटा वृक्ष, या सगळ्या आठवणींना सोबत घेऊन. आपलं आयुष्यहि थोडसं असच असतं ना?, "यथा काष्ठंच काष्ठंच . . . . . " या संस्कृत श्लोकाप्रमाणे.
काहि व्यक्ती आयुष्यात येतात, दोन-चार क्षणांची सोबत करतात आणि निघुन जातात. उरतात त्या फक्त आठवणी आणि आपण, "पारावरच्या त्या वृक्षासारखे" एकटेच.

 रंगपंचमीच्या दिवशी लाल रंग लावल्यामुळे रडकुंडीला आलेली हि चिमुरडी. पण पुढे आयुष्यात राग, लोभ, मद, मत्सर, मोह, यश, अपयश, द्वेष या सार्‍या रंगात रंगायचेच आहे हे जर तिला माहित असते तर या कृत्रिम रंगाची भिती कदाचित तिला वाटली नसती.

 "..........वार्ध्यक्य साचले, उरलो बंदी पुन्हा मी". आयुष्यातील सुखदु:खांचा हिशोब मांडताना, हातावर हात ठेवून, हताश होऊन, देवाला स्मरत बसलेले हे आजोबा.

"आयुष्य म्हणजे काय रे भाऊ?".
आमच्यासाठी सध्यातरी हे चाक आणि हा खेळ हेच आयुष्य आहे आणि तेच आमचे विश्व आहे. पुढंच पुढे बघु. हेच तर  सांगत नसेल ना हा?

"खांब केळीचे उभे, वरती तोरण शोभे
दारी चौघडा गाजे, सूर सनईचा वाजे..."
तिच्या आणि त्याच्या आयुष्यातील हळुवार पण तितकाच महत्वाचा एक क्षण.
आयुष्यभरासाठी त्याच्या हातात विश्वासाने हात देणारी ती आणि तितक्याच विश्वासाने तिला साथ देणारा तो.


संथ पाण्यात सहजच मारलेला एक दगड आणि त्यामुळे पाण्यावर उठलेले असंख्य तरंग.
आपल्या जीवनातही असंच असतं, येणारे एखादे दु:ख किंवा संकट हे एकटे न येता सोबत अनेक दु:खे/संकट घेऊन येतात ज्यामुळे कित्येकदा आयुष्य ढवळुन निघते. अर्थात हे त्या पाण्यावरच्या तरंगासारखेच कायम न रहाता काहिवेळानंतर निवांत होतात.

 तिकोना किल्ल्याची भटकंती करून आल्यानंतर पवनेच्या पाण्यात जरा फ्रेश होताना आमचे मित्र. फोटो पाहिल्यानंतर आमच्यापैकी एका मित्राने ह्या फोटोला नाव ठेवले "पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील तोफा" स्मित. आयुष्य अशाच अनेक गंमतीशीर प्रसंगानेही भरलेले आहे.

 रोज रोज त्याच त्याच आयुष्याचा (सुंदर सुंदर फुलांवर बसण्याचा) कंटाळा आला असेल कदाचित म्हणुन for a change हे फुलपाखरू चक्क मातीत बसले. अर्थात "मातीची" ओढ सगळ्यांनाच असते.

"जो सब करते है यारो, वो क्यों हम करे".
सगळे जे करतात ते मी का करू? कधी कधी प्रवाहाच्या विरूद्ध पोहणे हा हि आयुष्याचाच एक भाग आहे ना?

 कुणाला हा फोटो, निष्पर्ण, उजाड, उदास वाटेल,कुणाला हा फक्त एक पर्णहिन झाडाचा फोटो वाटेल, मला मात्र हा फोटो काढताना मोराच्या फुललेल्या पिसार्‍याची आठवण झाली होती. अर्थात आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो.

थोडक्यात काय तर "आयुष्य हे अळवावरचे पाणीच". घरंगळण्याआधी मनसोक्त उपभोगुन घ्या.