Sunday, 16 March 2014

आयुष्यावर बोलु काही . . . .

भटकंतीची आवड पहिल्यापासुनच. सह्याद्रिच्या कुशीत, देवळांच्या परिसरात, समुद्रकिनारी अगदी परदेशातहि मनसोक्त फिरलो. कधी मित्रांसोबत तर कधी फक्त कॅमेर्‍यासोबत. या सर्व भटकंतीमुळे माझ्याहि नकळत फोटोग्राफिचा "तिसरा डोळा" केंव्हा उघडला गेला ते माझे मलाच कळले नाहि. या तिसर्‍या डोळ्याद्वारे मला आता प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसु लागले आहे. बर्‍याचदा असे होते कि, आपण काढलेले फोटो पाहताना वाटते कि, अरे आपलं आयुष्यहि असेच आहे ना?". असेच काहि मी काढलेले फोटो आणि आयुष्य यांची सांगड घालुन काहि फोटो तुमच्यासमोर आणलेले आहे.
तेंव्हा,
जरा चुकिचे, जरा बरोबर बोलु काही
चला दोस्तहो (फोटोद्वारे) आयुष्यावर बोलु काही . . . . .ज्या रंगाचा चष्मा आपण घालतो त्याच रंगाची दुनिया दिसते. जर उदास, नैराश्याच्या चष्मा घातला तर सगळीकडे फक्त उदासी आणि नैराश्यच दिसेल, याउलट जर प्रसन्नतेचा चष्मा असेल तर सगळं जगच सुंदर दिसेल. अशीच एक प्रसन्न भटकंती करून घरी परतताना लोकल ट्रेनच्या खिडकीवरची कळकट्ट जाळी देखील सुंदर भासली.

"आयुष्य कितीही खडतर असलं तरी ते आनंदाने फुलवत रहा" हे या खडकावरल्या अंकुराकडुन आपणांस शिकता येईल.

"आयुष्य किती क्षणभंगुर आहे" हे ह्या फोटोला पाहिल्यावर मला नेहमीच जाणवणार. एकदा देवळांच्या भटकंतीला गेलो असता पायर्‍यांवर मला हि भेटली. तीचे मस्त फोटोसेशन केल्यानंतर जवळ पास अर्धा पाऊण तास देवळाच्या परिसरात भटकलो. परतीच्या वाटेवरती, या कालावधीत गोगलगायीने किती अंतर पार केले हे पाहण्यासाठी तेथे गेलो असता, कुणाच्यातरी पायाखाली येऊन तीचे अस्तित्वच संपले होते. खुप वाईट वाटले, त्यापेक्षा स्वतःचा राग जास्त आला. वाट वर्दळीची आहे हे माहित असुनही मी तिला जवळच्या झाडीत उचलुन ठेवले असते तर? ...........कदाचित एक जीव वाचला असता. :(


"कट्टा" सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. काहि क्षण मित्रमंडळी एकत्र येणार. गप्पांचे फड रंगणार आणि परत सगळे आपआपल्या मार्गी जाणार. उरणार तो एकटा वृक्ष, या सगळ्या आठवणींना सोबत घेऊन. आपलं आयुष्यहि थोडसं असच असतं ना?, "यथा काष्ठंच काष्ठंच . . . . . " या संस्कृत श्लोकाप्रमाणे.
काहि व्यक्ती आयुष्यात येतात, दोन-चार क्षणांची सोबत करतात आणि निघुन जातात. उरतात त्या फक्त आठवणी आणि आपण, "पारावरच्या त्या वृक्षासारखे" एकटेच.

 रंगपंचमीच्या दिवशी लाल रंग लावल्यामुळे रडकुंडीला आलेली हि चिमुरडी. पण पुढे आयुष्यात राग, लोभ, मद, मत्सर, मोह, यश, अपयश, द्वेष या सार्‍या रंगात रंगायचेच आहे हे जर तिला माहित असते तर या कृत्रिम रंगाची भिती कदाचित तिला वाटली नसती.

 "..........वार्ध्यक्य साचले, उरलो बंदी पुन्हा मी". आयुष्यातील सुखदु:खांचा हिशोब मांडताना, हातावर हात ठेवून, हताश होऊन, देवाला स्मरत बसलेले हे आजोबा.

"आयुष्य म्हणजे काय रे भाऊ?".
आमच्यासाठी सध्यातरी हे चाक आणि हा खेळ हेच आयुष्य आहे आणि तेच आमचे विश्व आहे. पुढंच पुढे बघु. हेच तर  सांगत नसेल ना हा?

"खांब केळीचे उभे, वरती तोरण शोभे
दारी चौघडा गाजे, सूर सनईचा वाजे..."
तिच्या आणि त्याच्या आयुष्यातील हळुवार पण तितकाच महत्वाचा एक क्षण.
आयुष्यभरासाठी त्याच्या हातात विश्वासाने हात देणारी ती आणि तितक्याच विश्वासाने तिला साथ देणारा तो.


संथ पाण्यात सहजच मारलेला एक दगड आणि त्यामुळे पाण्यावर उठलेले असंख्य तरंग.
आपल्या जीवनातही असंच असतं, येणारे एखादे दु:ख किंवा संकट हे एकटे न येता सोबत अनेक दु:खे/संकट घेऊन येतात ज्यामुळे कित्येकदा आयुष्य ढवळुन निघते. अर्थात हे त्या पाण्यावरच्या तरंगासारखेच कायम न रहाता काहिवेळानंतर निवांत होतात.

 तिकोना किल्ल्याची भटकंती करून आल्यानंतर पवनेच्या पाण्यात जरा फ्रेश होताना आमचे मित्र. फोटो पाहिल्यानंतर आमच्यापैकी एका मित्राने ह्या फोटोला नाव ठेवले "पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील तोफा" स्मित. आयुष्य अशाच अनेक गंमतीशीर प्रसंगानेही भरलेले आहे.

 रोज रोज त्याच त्याच आयुष्याचा (सुंदर सुंदर फुलांवर बसण्याचा) कंटाळा आला असेल कदाचित म्हणुन for a change हे फुलपाखरू चक्क मातीत बसले. अर्थात "मातीची" ओढ सगळ्यांनाच असते.

"जो सब करते है यारो, वो क्यों हम करे".
सगळे जे करतात ते मी का करू? कधी कधी प्रवाहाच्या विरूद्ध पोहणे हा हि आयुष्याचाच एक भाग आहे ना?

 कुणाला हा फोटो, निष्पर्ण, उजाड, उदास वाटेल,कुणाला हा फक्त एक पर्णहिन झाडाचा फोटो वाटेल, मला मात्र हा फोटो काढताना मोराच्या फुललेल्या पिसार्‍याची आठवण झाली होती. अर्थात आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो.

थोडक्यात काय तर "आयुष्य हे अळवावरचे पाणीच". घरंगळण्याआधी मनसोक्त उपभोगुन घ्या.

No comments:

Post a Comment